कोरोनाने IPLची विकेट घेतली, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित: BCCI चा मोठा निर्णय

< 1 Minutes Read

देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला असून स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान चेन्नईच्याही तिघांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलने स्पर्धा रद्द करत असल्याचं जाहीर केलं आहे.

बायो-बबलमध्येही करोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यातच बीसीसीआय सर्व सामने मुंबईत खेळण्याची तयारी करत होतं. मात्र यादरम्यान हैदराबादच्या वृद्धिमान साहा याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. हैदराबाद आणि मुंबईमध्ये आज दिल्लीत सामना होणार होता. खेळाडूंनाही करोनचाी लागण होत असल्याने अखेर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

चेन्नईच्या तीन सदस्यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी बुधवारी राजस्थानविरोधात होणारा सामना आपण खेळू शकणार नसल्याचं बीसीसीआयला कळवलं होतं. जोपर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांच्या संपर्कात आलेले सर्व खेळाडू तिन्ही चाचण्यांमध्ये निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत मैदानात उतरण्यास इच्छुक नसल्याचं चेन्नई संघाने बीसीसीआयला कळवलं होतं. नियमाप्रमाणे यासाठी सहा दिवसांचा कालावधी लागणार होता.

आयपीएलचे आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.

मुंबई उच्च न्यायालयात याचिका
आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना स्पर्धा रद्द करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. करोना स्थितीमुळे आयपीएल स्पर्धा पुढे रद्द करण्यात यावी किंवा पुढे ढकलावी असा आदेश बीसीसीआयला द्यावा अशा मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसंच आयपीएल स्पर्धा इतकी महत्वाची नसून खेळाडूंसाठी होणाऱ्या संसाधनांचा वापर करोना रुग्णांसाठी केला जाऊ शकतो असं याचिकाकर्त्याने म्हटलं होतं. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी याप्रकरणी सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *