कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे समर्थन! : नाना पटोले.

< 1 Minutes Read

कोरोनावर मात करण्याकामी जनतेने राज्य सरकारला सहकार्य करावे.महामारीत कोणीही राजकारण करू नये.

मुंबई:राज्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सरकारने सध्या विकेंड लॉकडाऊनसह काही कडक निर्बंध लावलेले आहेत. परंतु कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आणखी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी सरकार जो निर्णय घेईल त्याला काँग्रेस पक्षाचे पूर्ण समर्थन राहील, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोना परिस्थीतीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. त्यावेळी पटोले यांनी काही सूचनाही केल्या. राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याने सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. लोकांचे जीव वाचवण्याला प्राथमिकता दिली पाहिजे. कडक निर्बंध अथवा लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर तो नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनसारखा नसावा.

मोदींच्या नियोजनशून्य लॉकडाऊन निर्णयाने लाखो लोकांचे रोजगार गेले, लोकांचे प्रचंड हाल झाले तसे होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली. रेमडिसेवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून राज्यातील रुग्णांना ते सहज उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाय योजना कराव्यात अशी मागणीही पटोले यांनी केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करावे असे आवाहनही प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *